Ad will apear here
Next
पुण्यश्लोक छत्रपती थोरले शाहू महाराज


१८ मे १६८२ या दिवशी छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई राणीसाहेब यांना पुत्ररत्न झाले. हेच पुढे थोरले शाहू म्हणून इतिहासात अजरामर झाले. छत्रपती संभाजी महाराजांनी १६८१ ते १६८९ या नऊ वर्षांच्या कालखंडात मुघल सम्राट औरंगजेबाशी अतिशय धैर्याने सामना केला. 

महाराणी येसूबाई राणीसाहेबांनी राजाराम महाराजांना रायगडच्या वेढ्यातून अतिशय सुज्ञ अशी मसलत करून बाहेर काढले आणि आपले पुत्र शाहूराजे यांच्यासह कैद पत्करली. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनी जिंजी येथे राहून औरंगजेबाच्या सैन्यावर व अडचणींवर मात केली. संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यासारखे मर्दानी सेनापती; प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत, अमात्य खंडो बल्लाळ व परशुराम त्रिंबक प्रतिनिधी यांच्यासारखी स्वामिनिष्ठ माणसे तयार करून औरंगजेबाला जेरीस आणले. दुर्दैवाने राजाराम महाराजांचे तीन मार्च १७०० रोजी निधन झाले. त्यानंतर औरंगजेबाला मराठ्यांची पाळेमुळे पूर्णपणे उखडून टाकण्याची खात्री वाटली. मराठ्यांची मर्दुमकी ही गनिमी काव्याच्या कवचात दडलेली आहे, याची जाण धूर्त बादशहाला होती; मात्र एखाद्या अद्भुतरम्य कथेतील पोपटासारखे मराठ्यांचे राजे छत्रपती राजाराम महाराज महाराष्ट्राबाहेर केव्हाच निघून गेले व जिंजीला पोचचले होते. तिथे राहून त्यानी आपली राजसूत्रे अशी हलविली, की औरंगजेबाच्या मनोरथाची चाके महाराष्ट्राच्या मातीत रुतून बसली. मराठ्यांच्या तलवारींना तेज आलेले पाहून औरंगजेब दिपून गेला. 

राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यावर औरंगजेबाच्या आशेला पालवी फुटली; परंतु राजारामाची राणी ताराराणी, रणरागिणी भद्रकाली महिषासुरमर्दिनीच्या रूपात आपल्यापुढे उभी राहील, अशी कल्पनाही त्याच्या डोक्यात आली नाही. अशा वेळी त्या रणचंडिकेचे रूप पाहूनच तो विचलित झाला. अखेरीस मराठ्यांशी लढता लढता २० फेब्रुवारी १७०७ या दिवशी औरंगजेब बादशहाचे अहमदनगर येथे निधन झाले. 

त्यानंतर त्याचा मुलगा शहाजादा आज्जम याने १७ वर्षांनी शाहूराजांना कैदेतून मुक्त केले. महाराणी येसूबाई मात्र पुढे २९ वर्षं कैदेतच होत्या. तब्बल २९ वर्षं या महाराणीने आपले आयुष्य मुघलांच्या कैदेतच काढले. 

१२ जानेवारी १७०८ रोजी छत्रपती शाहूराजांचा सातारा येथील किल्ल्यावर विधीयुक्त राज्याभिषेक झाला. त्यांनी राज्यसूत्रं हातात घेतली. शाहूमहाराजांनी आपल्या मृदु स्वभावाने आपल्या काकी (महाराणी ताराराणी) आणि आपले चुलत बंधू (करवीर छत्रपती) संभाजीराजे यांच्याशी समझोत्याचे राजकारण केले. आपल्या कारकिर्दीत बाजीराव, नानासाहेब पेशवे, सरदार मल्हारराव होळकर, सरदार महादजी शिंदे, गायकवाड, आंग्रे, जाधवराव, दाभाडे यांच्यासारखे शूरवीर निर्माण केले आणि आपल्या राज्याचे साम्राज्यात रूपांतर केले. 

महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात काहीसा संघर्ष निर्माण झाल्यावर ताराराणीने पन्हाळा येथे आपली राजधानी निर्माण केली. वारणेचा तह झाल्यावर सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या. गुंतागुंतीचे राजकारण झाले. तरीसुद्धा शाहूमहाराजांनी अतिशय समजूतदारपणाने राजकारण करून पेशव्यांसारख्यांना आणि अनेक मराठा सरदारांना पराक्रमास वाव दिला व हिंदवी स्वराज्याच्या सीमा दिल्लीपर्यंत पोहोचविल्या. 

छत्रपती शाहू महाराजांबद्दल तत्कालीन कागदपत्रांतून अतिशय प्रशंसेचे शब्द वाचण्यास मिळतात. छत्रपती शाहूमहाराज साताऱ्यास तख्त करून राहिले, तेव्हापासून त्यांनी राज्यकारभार व युद्धप्रसंग मोठ्या मसलतीने केले. 

आपल्या सेवकांवर पूर्ण विश्वास ठेवून राज्यवृद्धी करण्याचे काम शाहूमहाराजांनी केले. माणसांची योग्यता पारखून त्यांच्यावर विश्वास टाकला व अतिशय सौजन्यशील वृत्तीने त्यांनी सर्वांना जवळ केले. 

शाहूमहाराजांनी औरंगजेबाच्या सहवासात १७ वर्षं काढली होती. औरंगजेबाच्या चरित्राचा त्यांनी जवळून अभ्यास केला होता. मुघलांची वृत्ती त्यांनी पूर्णपणे जाणली होती. कोल्हापूरच्या गादीशी तंटे त्यांनी कधीही विकोपास नेले नाहीत. किंबहुना ते सामंजस्यानेच मिटविण्याचे प्रयत्न केले. त्यामुळेच त्यांना पुण्यश्लोक हे विशेषण लावले जाते. थोरले छत्रपती शाहू महाराजांचा कालखंड अनेक गुंतागुंतीच्या घटनांनी भरलेला आहे. कारण शाहू महाराजांच्या कर्तृत्वामुळे मराठे थेट दिल्लीच्या पुढेही पोहोचले. 

शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र म्हणून जन्माला आलेले संभाजीराजे यांनी अवघ्या नऊ वर्षाच्या अल्पशा कारकिर्दीत औरंगजेबाशी लढत देऊन हौतात्म्य पत्करले. स्वराज्य जगवायचे असेल तर मृत्यूला कवेत घ्यावे लागते हे संभाजीराजांनी जगाला दाखवून दिले. छ. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर आपल्या मातोश्री येसूबाई राणीसाहेब यांच्याबरोबर सात वर्षांच्या शाहूराजांनासुद्धा औरंगजेबाची तब्बल १७ वर्षे कैद स्वीकारावी लागली होती. त्यांची सुटका झाली तेव्हा शाहूमहाराजांनी लयाला जाणाऱ्या मराठी साम्राज्याला वाचवण्यासाठी चैतन्य निर्माण करून साऱ्या हिंदुस्तानभर मराठ्यांचा दरारा निर्माण केला. मुघलांच्या कैदेतून सुटका होणे शाहू महाराजांच्या दृष्टीने एक क्रांतीचे पाऊल ठरले. या संधीचा फायदा घेऊन त्यांनी उत्साही कर्तबगार व्यक्तींना प्रोत्साहित करून राज्यवृद्धीसाठी त्यांचा उपयोग करून घेतला. 

महाराजांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच स्वराज्याचे साम्राज्य घडविण्याची किमया त्यांनी करून दाखवली. स्वतःच्या हिमतीवर व पराक्रमाने छत्रपतिपद मिळवून ते स्वराज्याचे महाराज झाले. या संधीचा फायदा घेऊन स्वराज्याला त्यांनी समता, बंधुत्व यांचा दिव्य आदर्श निर्माण करून दिला. शाहूमहाराजांच्या सौम्य आणि शांत स्वभावाचे प्रत्यंतर त्यांच्या जीवनात सातत्याने येत होते. शत्रूलासुद्धा घात करण्याची इच्छा होऊ नये असा हा राजा अजातशत्रू म्हणून प्रसिद्ध होता. वडिलांचे छत्र बालपणीच गेले होते व आईच्या संस्कार करण्याच्या दिवसातच आईचे जीवन कैदेत गेले. वयाच्या सातव्या वर्षापासून शाहूराजे मुघली संस्कृतीत वाढले. संभाजीराजांच्या हाल-हाल करून झालेल्या मृत्यूनंतर येसूबाई व शाहूराजे यांना शापित आयुष्य जगून स्वराज्यासाठी स्वतःची आहुती दिली. शाहूराजे दुर्बल नव्हते. ते संभाजीराजांचे पुत्र होते. एक निर्मोही, उदात्त व सर्वांवर उदार अंतःकरणाने प्रेम करणारा हा राजा होता. शाहू महाराज म्हणजे सर्वांना छाया देणारे झाड होते. म्हणूनच महाराष्ट्राची भगवी पताका स्वराज्यात फडफडत राहिली. 

शाहूराजे छत्रपती झाले त्या वेळी त्यांच्याकडे स्वतःचे राज्य नव्हते, पुरेसे सैन्य नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीत शाहूराजांनी दक्षिणेपासून तंजावरपर्यंत तर ओडिशा-बंगालपासून गुजरातपर्यंत मराठा साम्राज्य पसरवले. थोरल्या शाहू छत्रपतींनी आपल्या यशाचे पूर्ण श्रेय छत्रपती शिवरायांना देताना म्हटले ‘थोरले छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद व त्यांचे पायाचा प्रताप त्यांनी इतके रक्षण करून हे दिवस मला दाखवले.’ 

१५ डिसेंबर १७४९ रोजी छ. शाहू महाराज यांचे सातारा येथे निधन झाले. अशा या अजातशत्रू, पुण्यश्लोक छत्रपती थोरले शाहू यांना कोटी कोटी प्रणाम. 

- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर
(इतिहास अभ्यासक, पुणे)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EVNSCT
Similar Posts
रायाजीराव जाधवराव निजामाच्या सैन्याविरुद्ध लढताना रायाजीराव २५ फेब्रुवारी १७२८ रोजी पालखेड येथे लढाईत धारातीर्थी पडले.
कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे छत्रपती राजाराम महाराजांच्या तिसऱ्या पत्नी राजसबाई यांच्या पोटी जन्माला आलेले संभाजीराजे हे कोल्हापूर राज्याचे दुसरे छत्रपती. २० डिसेंबर हा त्यांच्या स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्याविषयी...
स्त्री-शिक्षणासाठी झटलेल्या श्रीमंत इंदुमती राणीसाहेब राजर्षी शाहू महाराजांच्या स्नुषा श्रीमंत इंदुमती राणीसाहेबांनी स्त्री-शिक्षणविषयक, तसेच अन्य सामाजिक कार्यातून राजर्षी शाहू महाराजांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला. ३० नोव्हेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
दुसरे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले (सातारा) साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले यांचा १४ ऑक्टोबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language